Sunday, May 3, 2020

निर्मित (भयकथा/ गूढकथा)
"निर्मित"

लेखक✍️- अजय धामणे

"अवि, जाशील ना रे नीट..! कसली भीती नाय ना वाटणार??"- एकजण अवि ला म्हणाला.

"हं..! भीती आणि या अविनाश लां. कसली घंट्याची..! आपण नाय घाबरत कुणाला.. कळलं काय..!"
- अवि एकदम बिनधास्त असलेल्या सुरात म्हणाला.

"तरी पण ए बाबा काय तो नीट विचार कर.. अरे ती जागा चांगली नाय रं बाबा..! - राजू त्याला म्हणाला.

" तरी पण मी जाणार त्या तिथल्या भुताटकी च दर्शन घेणार आणि मगच येणार.."

"हे बघ बाबा काय ते नीट विचार कर आणि मग जा." राजू

"मी त्या तिथल्या भुता बिताला बघणार म्हणजे बघनार आणि माझी हिंमत इथं सिध्द करणारच" - अवि म्हणाला.

" अायला.. जाम डेरिंगबाज आहेस भावा तू.." - त्या जमलेल्या घोळक्या मधून कोणीतरी पुटपुटल.

अवि, अविनाश. कॉलेज वयातला तरुण मुलगा. एकदम बिनधास्त, Dashing, स्टायलिश, आणि श्रीमंत घरात वाढलेला होता. त्याची एक वाईट सवय होती.. ती म्हणजे थापा मारण्याची. एखादी शुल्लक गोष्ट मोठी करून सांगायची. उदाहरणार्थ, समजा याने मुंबई ते दिल्ली हा प्रवास राजधानी एक्सप्रेस ने केला वेटींग रीजर्वेशन तिकिटावर केला असेल तर तो मित्रांना मात्र आपण इंडिगो विमानातून मधून ७ हजार रुपयांचे तिकीट काढून प्रवास केला आणि तिथल्या सर्व हवाई सुंदरी जणू ह्याच्यावर फिदा झाल्या होत्या अस काही तो वाढवून सांगायचा. त्याचा हा थापाड्या स्वभाव फक्त त्याचा खास मित्र राजू ला माहीत होता. हे सर्व मित्र मैत्रिणी अवि राजू आदी वैगेरे एका बॉईज हॉस्टेल मध्ये राहत होते. बॉईज हॉस्टेल म्हटलं की अतरंगी पणा आणि टवाळ गिरी ही आलीच. याच टवाळगिरी मधून हे चॅलेंज या अवि ला त्याच्या मित्राकडून देण्यात आलं.

हॉस्टेल च्या मागे असलेल्या चोर रस्त्यात सर्व मुलं जमली होती. कारण मुख्य रस्त्यापाशी सदा मामा म्हणजेच हॉस्टेल चे वॉचमन काका पहारा देत होते. म्हणून सर्व मुलं गुपचूप या अवि च्या चॅलेंज चा खेळ पाहण्यासाठी सुम मध्ये येऊन या मागच्या बाजूला थांबले होते.

अवि चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एकटाच त्या वाटेने चालू लागला. हातात विजेरी (बॅटरी) घेऊन त्या जुन्या वाड्याच्या रस्त्याने चालू लागला. मागे जमलेली सगळी मुलं त्याला उत्सुकतेने पाहत बसली.

बॉईज हॉस्टेल पासून काही नजीकच्या अंतरावर असलेला जुनाट वाडा. बरीच वर्षे साधारणतः ५०-६० वर्षापासून हा वाडा निर्जन पडला होता. वाड्यात पुष्कळ काळापासून कोणीच रहात नव्हतं. आणि तसे पाहता फारशा काळापासून निर्जन असलेली वास्तू झापटलेली किंवा भुताटकी असलेली वास्तू च म्हणून समजली जाते. म्हणूनच की काय त्या वाड्यात दिवसा जायची कुणाचीच हिंमत होत नव्हती.

आंधाऱ्या वाटेत चालता चालता हा त्या
वाड्या जवळ पोहोचला. वाड्याचं फाटक उघडलं आणि आत शिरला. वाडा फारच जुना असल्याने तोडकमोडका वाटत होता. त्या अंधारात मात्र वाड्याच्या संपूर्ण दिसण्या बद्दल त्याला अंदाज लागत नव्हता. पाया खालच्या वाटेवर विजेरी मारत हा वाड्यात शिरला.

'अवि' हातातली विजेरी सावरत कसाबसा दचकत त्या काळोखातून चालत होता..थोडासा सवतःला सावरत हा चालला होता.. तसा ही धीट होता.. पण अंधारात या त्याच्या धीटपणालाच धीट व्हायची गरज भासत होती कारण हा अंधार त्याला या पडक्या तोडक्या मोडक्या भिंतीच्या सामान्य आकृत्या असामान्य चित्रातून दाखवत होता. हा भास च होता की आणखी काही त्याला ही कळत नव्हते. पण अंधारात हे असेच होत असते ना. प्रत्येकाचे मानवी मन काळयाकुट्ट अंधारात हाच प्रतिसाद देत असते.

हा आत शिरला. वाडा तसा रिकामी च होता. मोजक्याच वस्तूंनी सामावलेला. पण जळमटांनी भरलेला तो वाडा जणू एखाद्या horror चित्रपटाचा भव्यदिव्य सेटच वाटत होता. वातावरण एकदम सामान्य होतं. हा माडीवर(माळ्यावर) गेला.. तिथेही तीच जळमट एक मोडकी खुर्ची. अवीने वाड्याच्या सर्वत्र दिशेने याने बॅटरी फिरवली. भूत काय भुताचं केस सुद्धा याला दिसलं नाही. धावत धावत हा जिन्यावरून खाली उतरला. त्याने अख्खा वाडा हळु हळु शोधून काढला. तरीही कोणी असामान्य अस त्याला तिथे दिसलच नाही.
त्याला आता खात्री पटली हा वाडा तर नॉर्मल आहे. भुताटकी च्या नुसत्या अफवा या वाड्याबाबत पसरल्या आहेत. हा तिथून हॉस्टेलच्या मार्गाकडे निघाला.

पण जाता जाता याच्या मनात एक विचार आला की आपण असे रिकाम्या हाताने कस जायचं.. मुलांनी विचारलं की भूत पाहिलंस का? कसं दिसत होतं? काही केलं तर नाही ना तुला? तर काय उत्तर द्यायचं. ठोंब्या सारखं गप्प राहून सांगायचं का छे बाबा तिथे कोणी भूत बित नव्हत. अस सांगितल तर त्यात मजा नाय. काहीतरी थाप या पोरांना मारलीच पाहिजे. भूत पाहिलं अस सांगितल तर निदान माझी चर्चा तरी होईल. साहसी मानलो जाईन मी. सर्व माझी निंदा करतील. आणि या विचाराने तो हॉस्टेल पर्यंत पोहोचला. आणि धावत धावत मित्रांपाशी गेला.

पोहोचल्या पोहोचल्या याने त्याच// अॅक्टींग करायला सुरुवात केली चेहऱ्यावर तीव्र भीतीचे आणि काही गंभीर असे भाव आणले. सर्वजण त्याच्याकडे आली चुळबुळ करीत त्याला विचारू लागली.

"काय रे अव्या..! काय झालं??
"कसं होतं ते दिसायला??"
"तुला काय केलं नाय ना त्याने??"
"अरे सांग भरभर कोण दिसलं का?"

"अरे बाबांनो थांबा..त्याला आधी श्वास तर घेऊद्या"
- अविचा परम मित्र राजू सर्वांना विणवित म्हणातो.

"सांगतो सांगतो..सर्व सांगतो"
अवि मनात एक कथा रचवित पण अस्सल अॅक्टिंग करीत सांगू लागला.

' ठरल्याप्रमाणे मी त्या वाड्यात शिरलो. आत जाताच मला भीती वाटू लागली. भयाण शांतता होती. वातावरण खूप गंभीर होतं. आत शिरताच एका म्हातारीच्या किंचाळण्या चा आवाज ऐकू आला. एकदम भयानक आणि जोरदार किंचाळी होती ती. आवाज वरच्या दिशेने येत होता..मी मात्र माझी हिंमत खचू देऊ दिली नाही. मी वर गेलो तीला पाहण्यासाठी कोन आहे ती. वर गेलो तर.. ती होती.. एक विचीत्र म्हातारी.. पिकलेले केस तिचे विचित्र विस्कटेलेले.. तीव्र हसत होती ती..एकदम कर्कश... हसताना तिच्या किडलेले राक्षसी दात खूप भयंकर दिसत होते. तिच्या एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात एका म्हाताऱ्यचं मुंडकं. फक्त मुंडकं.. कदाचित तो तिचा नवरा असावा.. पण एकंदरीत सर्व काही भयानक दिसतं होतं.. ती काठी टेकत टेकत माझ्याकडे धावून येतच होती..इतक्यात मी तिथून निसटलो आणि इथवर धावून आलो.. कसाबसा वाचलो रे भावांनो.. पण हा तुमचं चॅलेंज मी पूर्ण केलं रे बाबा..!

"आयला भावा मानायला हवं तुला.. जाम हिंमत हाय तुझ्यात"

"लेका बाल बाल बच गया तू.. शेर दिलं है तू भाई"

सर्व पोरं त्याच्या या खोट्या कर्तृत्वाचा गौरव करू लागली.
" ए आता रात्र खूप झालीय. सदा मामा जागा होईल.. चला लवकर" राजू सर्वांना म्हणाला.

सर्व जण एकेक करून हॉस्टेल मध्ये जाऊ लागली
अव्या पण आत जाणारच होता इतक्यात राजुने त्याला थांबवलं. आणि त्याला विचारलं -

"काय रे साल्या अव्या..! मला सांग तुला खरचं कोणी म्हातारी दिसली की..!

" अब तेरे से क्या छुपाना दोस्त.. म्हातारी काय म्हातारी च बूट सुध्दा नव्हतं तिथं" - अवि म्हणाला

"साल्या थापाड्या..! तरी मला वाटलेलच. "

"मग कशी व्हती अॅक्टींग??"

"तुला तर ऑस्कर द्यायला हवा राव..!"
दोघेही एकमेकांना टाळी देत हसू लागले..

"चल राजू मला जाम झोप आलीय वाजलेत बघ किती"

वाजलेत बघ किती असे म्हणत अविने त्याचा हात समोर केला.. पण त्याच्या हातात त्याच घड्याळ नव्हतं.

"राजू अरे माझं घड्याळ. माझं रोलेक्स च महागातल घड्याळ कुठाय."

"अवि अरे नीट बघ इथेच कुठ तरी असेल..!"

"अरे नाही रे मघाशी जाताना हातातच होतं.. मला वाटतं त्या वाड्यात च पडलं असेल.. मी जिन्यावरून उतरताना खाली धावत आलो ना तेव्हा कदाचित पडलं असावं."

"मग आता??"

" मी ते आणायला जातो. तू येतोस रे चल"

"आता या वेळी आणि त्या वाड्यात. अरे नाही रे.. नको.. आपण उद्या जाऊ..

" अरे मुर्खा चल ना अरे माझं महाग घड्याळ होतं ते. पटकन जाऊन आणू.."

" अरे मला झोप येतेय तू ये की जाऊन आणि तू एकदा जाऊन आलाय ना. मग तुला नाही काही वाटणार. पण मला भीती वाटेल. "

" साल्या भित्र्या.. चल जा.. मीच एकटा जातो. मला नाही कोणाची पर्वा. " अवि राजुवर रागात येऊन म्हणाला.. आणि इथून निघून गेला.

अवि पुन्हा त्या वाड्या जवळ आला, आत शिरला, आत आधी सारखंच कोणीच नव्हत..अवि पायरी जवळ त्याचं घड्याळ शोधू लागला. आणि त्याला त्याच घड्याळ मिळालं सुध्दा. पण... पण....पण...
घड्याळ च्या बाजूला रक्ताचे थेंब होते... हो हो रक्ताचे थेंब.....
या थेंबाची धार त्या मुंडक्यातून येत होती.... जे मुंडकं त्या म्हातारीच्या हातात होतं... ती क्रूर पणे अवि कडे पाहत होती.. ही तीच म्हातारी होती जी आविने त्याच्या मनात रचवली होती...अविकडे पाहून विचीत्र हसत होती.. ती त्याच्याकडे धावून येणार इतक्यात हा निसटला आणि आणि हॉस्टेल कडे धाव घेऊ लागला... हॉस्टेल कडे जात असताना मगाचे गंभीर आणि तीव्र भीती असणारे भाव आता सुद्धा याच्या चेहऱ्यावर होते..पण ते यावेळी खरे होते..

त्याच्या मनात अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू झाला.. कोण होती ती म्हातारी...? खरचं ती एखादी भूत होती का..? की नुसता अभास...? की त्याने निर्माण केलेली कल्पना..? की निर्माण केलेलं भूत?? निर्माण केलेलं??? निर्मित ???


______समाप्त________

- ✍️ अजय धामणे
(SYBMM. अभिनव महाविद्यालय,भाईंदर. Mob- ९५०३२५६४९३)


No comments:

Post a Comment

निर्मित (भयकथा/ गूढकथा)

"निर्मित" लेखक✍️- अजय धामणे "अवि, जाशील ना रे नीट..! कसली भीती नाय ना वाटणार??"- एकजण अवि ला म्हणाला. "हं..! भी...