Sunday, May 3, 2020

चेटकीण ( भयकथा/ गूढकथा)




                         "चेटकीण" 
                              
                                  ✍️ लेखक - अजय धामणे

    कालच माझा पंधरावा वाढदिवस झाला. २ फेब्रुवारी, माझ्या आयुष्यातला एकमेव आनंदाचा दिवस. काका काकी, मामा मामी, आत्तू चिंटू, दिपू ताई, पिंट्या दादा सगळे माझ्या वाढदिवसाला मोठ्या आनंदाने उपस्थित होते. 'हॅपी बर्थडे मुकुंदा' असं इंग्रजी मजकुरात लिहलेला सुंदर असा तीन मिनारी केक खास पप्पांनी माझ्यासाठी आणला होता. सगळ्यांनी माझ्यासाठी भरभरून खाऊ आणि गिफ्टस वगैरे आणले होते. याच साऱ्या गिफ्टस चा पसारा माझ्या खोलीत जमा झाला होता. त्यात मी काहीतरी शोधत होतो.. पुस्तक.. पिंट्या दादाने भेट म्हणून मला पुस्तक देणार असं वचन दिलं होतं.. पिंट्या दादा ला माझ्या सगळ्या आवडीनिवडी ठाऊक होत्या, त्यातच मला भुताखेतांच्या गोष्टी वाचायला फार आवडतं हे ही त्याला माहीत होतं. म्हणूनच  त्याच प्रकारातलं पुस्तक तो मला भेट म्हणून देणार होता. तेच मी या गिफ्टस च्या ढिगाऱ्यात शोधत होतो.. आणि मला शेवटी ते मिळालंच. गुलाबी रंगाच्या गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल ते पुस्तक मी माझ्या हातात घेतलं. त्या पुस्तका च्या स्टिकर वर दादाने त्याच्या हाताने 
"टू माय डिअर मुकुंदा, फ्रॉम हीस लाडका पिंट्या दादा" हे वाचून मला खूपच हसू आलं. कारण दादा ला सवयच होती, मराठी आणि इंग्रजी एकत्र करायची आणि विनोदनिर्मिती करायची. मी ते रॅपर फोडलं आणि आतलं पुस्तक बाहेर काढलं.  "चेटकीण आणि तिचे रहस्य" असा शीर्षक त्या त्या पुस्तकाचा होता आणि कव्हर वर लाल साडी नेसलेल्या आणि चेहरा नसलेल्या जागेवर चेहऱ्याच्या जागी काळा रंग असलेल्या बाईचं पोट्रेट होतं. आणि रक्ताचे शिंतोडे उडावे तसे रंग त्या कव्हर वरती फेकलेले होते. एकूणच पुस्ताकाची  सारी सजावट आकर्षणीय होती. मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचण्यासाठी हा संध्याकाळचा वेळ वातावरण निर्मिती साठी योग्यच होता. मी वाचू लागलो -
'चेटकीण, चेटकीण ही दिसायला सामन्य स्त्रीप्रमाणेच असते. पण ती सामान्य अजिबात नसते. लाल रंग तिच्या आवडीचा असतो.  तिला लहान मुलांबद्दल खूप आकर्षण असतं. लहान मुलं तिला फार आवडतात.  दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्याच्या २९ तारखेला चेटकिणीचा वाढदिवस येतो आणि तिच्या प्रत्येक वाढदिवसाला ती तिच्या मूळ रुपात येते आणि एका लहान मुलाचा बळी घेते. त्या लहान मुलाच्या बळी वरती ती जगत असते. चेटकीण फ पूजा करते. काळी विद्या तिला ज्ञात असते.  तिची वाणी, तिचं बोलणं हे मधुर आपुलकीचं असतं पण ते तिच्या भक्षकाला फसवण्यासाठी असलेलं षडयंत्र असतं.चेटकिणीची संपूर्ण शक्ती ही तिच्या लांबलचक केसांच्या वेणी मध्ये दडलेली असते. चेटकणीला कायमचं नाहीसं करायचं असेल तर तिच्या मानेखाली कंठा जवळ धारधार दगडाने तीन वेळा आघात करावा. तरच तिचा अंत होतो.'
"बापरे किती भयंकर आहे चेटकीण हा प्रकार" - मनातल्या मनातलं चालू असलेलं वाचन थांबवत  मी स्वतःशीच पुटपुटलो.
"खरचं चेटकीण या जगात अस्तित्वात असेल काय?" मी स्वतःलाच प्रश्न विचारला. 
"अगो चेटकीण च असा ती, जखीन मेली. "
मला आमच्या हॉल मधून हा आवाज ऐकू आला. शेजारच्या नाईक काकूंचा आवाज होता तो. संध्याकाळी कधीतरी आईसोबत गप्पा मारण्यासाठी आमच्या घरी येतात. आजही त्या आल्या असाव्यात. पण त्या नेमकं चेटकीण म्हणून कोणाला उद्देशून म्हणाल्या हे जाणण्यासाठी मी माझ्या खोली च्या दाराजवळ गेलो आणि कानोसा देत ऐकत बसलो.

"तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात ओ नाईक वहिनी?" माझ्या आईने विचारले.
"अगो तिचं बी विंग मधली रेखा." रेखा काकी गेल्याच महिन्यात नवीन रहायला आलेल्या होत्या. त्या मुळे मी त्यांना पाहिलेलं होतं. उंचीने मोठ्या, गोरा रंग, चालण्याची एक विशिष्ट शैली, अशा काहीशा त्या होत्या. मी त्यांना बघितलं होतं पण ओळखून नव्हतो.
"रेखा? तिच ना गेल्या महिन्यात नवीनच रहायाला आली.  तिचं काय आता?" - आईने विचारले.
"होय तीच. अगो मेली एकटीच रव्हता. नवरा म्हणे सोडून गेला लग्नानंतर काही वर्षांनी. "
" हा मग यात तिला चेटकीण म्हणण्यासारखं काय?"
"अगो सांगतय.. तू काय घरातल्या घरात बसून असतंस. म्हणून तुका ठाव न्हाय. आम्ही बायका बाहेर फेऱ्या मारुक येताव  म्हणून काय ते काय बाय ऐकलंय तिच्या बद्दल. अगो दिसता तशी नाय ती बाई. राक्षसिन हाय ती राक्षासिन. अगो स्वतःच्या लहान बाळाक मारल्यान तिनं."
"काय? स्वतःच्या पोटच्या मुलाला मारलं?" 
"व्हय.चार वर्षापूर्वी ची घटना. हिचो नवरो रात्र पाळी साठी कामावर गेलो व्हतो. ही आणि हिचं ६ महिन्याचं बाळ दोघच घरी होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा हीचा नवरा सकाळी कामावरून आला तेव्हा त्यांच्या घरात खूप सारी गर्दी जमा झाली होती. ही बाई एका कोपऱ्यात स्तब्ध बसून होती. आणि हिच्या समोरचं काही अंतरावर हीच बाळ जमिनीवर पडून होतं. पण ते रक्तबंबाळ अवस्थेत होतं आणि मेलेलं होत"
"काय? त्या एवढ्याश्या चिमुकल्या जीवाचा  मृत्यू झाला. बापरे..! पण असं कसं झालं हे?"
"तो एक अपघात होता. ही बाई किचन मध्ये जेवण करत होती आणि तिचं बाळ हॉल मध्ये होतं. अचानक हॉल मधला फोन वाजला. ही तशीच धावत बाहेर आली. किचनमधून येत असताना हीचा धक्का तिथेच ठेवलेल्या तेलाच्या भांड्याला लागला..अख्ख्या किचन भर तेल पसरलं. पण त्या बाईला याची शुध्द नव्हती. ती फोनवर तिच्या नातेवाईकांशी गप्पा मारत बसली. बराच वेळ ती गप्पा मारत होती.  गप्पा मारून झाल्यानंतर तिने तिच्या रडत असलेल्या बाळाला उचलुन घेतलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि अचानक तिच्या लक्षात आलं गॅस वर ठेवलेलं दूध उतू जातंय. ती लगेच तशी बाळाला कवेत घेऊन किचन मध्ये धावत गेली.. किचन मध्ये शिरताच तिचा पाय फरशीवर पडलेल्या तेलावरती पडला.. आणि ही घसरली. घसरताना तिच्या हातातून तिचं बाळ निसटलं  आणि ते तिच्या हातातून उडून खाली जमिनीवर कोसळलं.. ते बाळ खाली पडताना जोरात आपटलं गेलं.आणि जागीच त्या निरागस जीवाचा प्राण गेला. या एका मोठ्या अपघातात तिचं बाळ गेलं. पण त्यांच्या सोसायटी मधले सारे हेच म्हणतात का याच चेटकनिणीने  तिचा बळी घेतला. आणि याच घटनेनंतर ती वेड्यासारखं वागू लागली.. घरात कधी हसायची काय रडायची काय, तिच्या याच वागण्याला कंटाळून तिचा नवरा तिला कायमचा सोडून गेला."
"काय सांगतेस?? किती भयंकर आहे हा प्रकार.. आणि काय गं तुला हे सारं कोणी सांगितलं ?
"कोण काय सांगेल. माझ्या चुलत बहिणीची सून राहते त्या सोसायटी मध्ये तिनेच सांगितलं. वर हे पण सांगितलं की ती आता तुमच्या सोसायटी मध्ये आलीय तर त्या बाई पासून जरा सावध रहा."
"पण नाईक वहिनी हा सारा प्रकार खरंच अपघातच असेल हो. ती कशाला म्हणून स्वतःच्या बाळाचा जीव घेईल."
"घेऊ पण शकते ओ. ती बाई फारच विचित्र आहे. अगो देवाक सुध्दा नाय मानत. "
"काय नास्तिक आहे का ती?"
"असेल बाबा. ते काय आपल्याला माहीत नाय. पण गेल्या आठवड्यात सोसायटी च्या सत्यनारायणाच्या पूजे साठी वर्गणी देण्यास नकार केला तिनं आणि साधं पूजेच्या पाया पडायला देखील आली नाही. "
"काय माणसं असतात ना हल्ली"
"हो ना. अहो वहिनी, आजकाल माणसांच्या वागण्याच्या काही भरवसा देता येत नाही ओ..माणूस कोण आणि सैतान कोण ओळखण कठीण जातं. "
"नाईक वहिनी तुम्ही कधी कधी काय बोलता काहीच कळत नाही.."
"जाऊद्या ओ. अशा किती घटना घडत असतात. असो मी काय गप्पा मारत बसले.. आमचे ह्यांना आता भुका लागतीलच मी जाते त्यांना वाढायला. चला येते हा वहिनी"
नाईक वहिनी इतकं बोलून तिथून त्यांच्या घरी गेल्या. पण मी जे सारं काही ऐकलं होतं ते फारच भयानक होतं. आता यात सत्य किती आणि असत्य किती याची पडताळणी बाकी होती. 

जेवण वैगेरे आटपून मी माझ्या खोलीत माझ्या बिछान्यावर अंग टाकून पडलो. पण त्या रात्री माझं मन सारखं एकाच गोष्टीत गुंतलेलं होतं,  त्या बी विंग मधल्या रेखा काकू खरंच चेटकीण असाव्यात का???

एका आठवड्यानंतर... 

    रविवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही सारे चिल्लर पार्टी अपार्टमेंट च्या अंगणातच क्रिकेट खेळत होतो.. चिंटूची बॉलींग होती.. आणि रव्याची बॅटिंग.. मी फिल्डींग वर होतो.. रव्याने पहिल्या बॉलाताच चौकार मारला.. तो थेट गेट जवळ गेला. गेट च अंतर माझ्या पासून नजिक असल्यावर बॉल आणण्यासाठी मला जाणे भागच होते. मी गेट पाशी गेलो... गेट च्या बाजूलाच कुंड्या जवळ पडलेला बॉल मी उचलला आणि समोर चालू लागलो.. इतक्यात समोरच्या गेट मधून रेखा काकी चालत येत होत्या.. आत येताना त्या खूपच खुश वाटत होत्या... पण त्या एकट्या नव्हत्या.. त्यांच्यासोबत एक सुंदर मुलगी होती.. जेमतेम माझ्याच वयाची.. तिला पाहून तरी तसंच वाटत होतं.. छानसा पंजाबी ड्रेस घालून ती मुलगी रेखा काकिंच्या जोडीने आत येत होती.. आत येत असताना ती जरा लाजत होती, गेट च्या आत प्रवेश करताच ती जरा जागीच थांबली आणि तिने साऱ्या अपार्टमेंट कडे आणि भोवतालच्या परिसराकडे एकदम मन भरून पाहिले.. रेखा काकी ने तिला आत येण्यास सांगितले. ती पुढे आली.  दिसायला ती खूपच देखणी होती.. मला बघताच क्षणी ती आवडली.. माझ्या अगदी मनातच भरली..पण ही गोंडस परी या रेखा काकिसोबत का बरं आली असावी..? ती तिच्या नात्यातली असावी का? कोण बरं आहे ही? असे अनेक प्रश्न माझ्या मनात डोकावले. "ए मुक्या अरे अजुन सापडला नाही का बॉल?" रव्याची हाक ऐकताच मी त्याला "आलो रे" असा प्रतिसाद देत पुन्हा खेळायला गेलो. 
त्या रात्री सुध्दा मला नीट झोप लागत नव्हती.  चेटकीण आणि रेखा काकू यांचं समीकरण एकमेकांशी खरंच जुळत आहे का, याबद्दल विचार करीत मन गुंतल होतं. कारण चेटकिणीला लहान मुलं प्रिय असतात..मी पुस्तकात वाचलं होतं.. आणि म्हणूनच रेखा काकूंनी कदाचित त्या नवीन मुलीला त्यांच्याकडे राहायला आणलं असाव का? छे छे , मी काय हा असला फालतू विचार करत बसलोय.. पुस्तका मधल्या गोष्टी तर काल्पनिक असतात ना.. आणि  ती मुलगी कदाचित त्यांची नवीन पाहुणी वगैरे असेल.. पण मुलगी दिसायला खूप सुंदर आहे.. अगदी गोंडस.. त्या मुलीच्या विचारताच माझं मन गुंतल..आणि मी शांत झोपी गेलो..

      दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो.. आज वर्गात पहिलाच तास इतिहासाचा होता. बेडेकर बाई शिकवायला येणार होत्या. अद्यापही त्या आलेल्या नव्हत्या.. प्रत्येक तासाला उशिरा यायची त्यांची ही सवयच होती.. आणि त्या उशिरा आल्या.. पण  त्यांच्यासोबत मुख्याध्यापक श्री. परांजपे सर आणि चक्क ती होती.. तीच ती.. काल रेखा काकीसोबत आलेली मुलगी.. तिला पाहून मी जरा जास्तच आनंदीत झालो कारण मला आवडत असलेली मुलगी चक्क माझ्याच वर्गात ही गोष्टच किती सुखद होती.
"गुड मॉर्निंग नववी ब च्या विद्यार्थ्यांनो..तर  ही आपल्या शाळेतील नवीन विद्यार्थिनी मिताली." - मुख्याध्यापकांनी आम्हाला तिची ओळख करून दिली.
"ही मिताली.. हिचं सहामाही पर्यंत च शिक्षण दुसऱ्या शाळेत झालं आणि काही कारणास्तव हिला ती शाळा सोडून इथे या शहरात शिफ्ट व्हावं लागलं. आणि म्हणूनच या होतकरू मुलीची अडचण लक्षात घेता आम्ही हिला पुढील शिक्षणासाठी आमच्या शाळेत प्रवेश मंजूर केला आहे. त्यामुळे मुलांनो तुम्ही या मुलीला नीट समजून घ्याल. आणि हिच्याशी मैत्रीचे, सलोख्याचे संबंध ठेवून मिळून मिसळून वागाल अशी माझी खात्री आहे. बाळ मिताली तुझी ओळख करून दे."
"हाय ऑल ऑफ यू."
- मिताली तिच्या गोड आवाजात ओळख करून देऊन लागली. 
"माझं नाव मिताली. मिताली रेखा साळवे..या आधी मला ना आई बाबाच नाव होतं ना आडनाव.. मी अनाथ होते.. माझं या आधीच सारं शिक्षण अनाथ आश्रमात झालं.. नुकतच मला माझ्या नवीन आईने मला दत्तक घेऊन पुन्हा जन्म दिला.  मला या जगात आणले. आईची माया देण्यासाठी ती पुढे आली. आणि मला या शाळेत शिक्षण घेऊन दिले.   तुमची ही शाळा मला खूपच आवडली. या शाळेत प्रवेश दिल्याबद्दल मी प्रिन्सिपल सरांचे खूप खूप आभारी आहे." 
"बाळ तू आज पहिल्या बाकावर बस. बेडेकर बाई तुम्ही शिकवायला सुरू करा" इतकं म्हणून मुख्याध्यापक सर तिथून गेले.
मी मात्र तिचं नाव ऐकून एकदम अवाकच झालो. कारण मिताली रेखा काकूंची दत्तक मुलगी होती...

    शाळा सुटल्यानंतर.. मी मितालीचा पाठलाग केला.. कारण.. मला तिच्याशी काहीही करून मैत्री करायचीच होती.. मी तिचा पाठलाग करतोय हे तिला ठाऊक होतं.. तिने मागे वळून पाहिलं.. मला ओळखल्या सारखं केलं..तिला कळलं होतं की मी तिच्याच अपार्टमेंट मधला एक आहे.. ती जागीच थांबली.. कदाचित माझ्यासाठीच.. मी थोडा दचकलो.. तरीपण खाली मान घालत, नजर लपवत चालू लागलो..  आणि तिच्यापाशी पोहोचलो.
"तू माझा पाठलाग करत होतास?" तिने विचारले.
"खरंतर हो?"
"का?"
"ते आपलं हे अगं.. ते हे.. हा. तू.. तुझ्याकडे सगळी पुस्तकं आहेत ना. नाय म्हणजे माझ्या चुलत दादाची जुनी पुस्तकं तुला दिली असती.. "
"तू हे विचारायला चक्क माझा पाठलाग केलास?
"हो..."
मी घाबरलेल्या स्वरात म्हणालो. ते ऐकताच ती हसली.. खुदकन हसली.. मी मात्र तिच्याकडे एकटक पाहत बसलो.. 
"माझ्याशी मैत्री करशील?" तिने स्वतःहून मला विचारले. मी हसत हसत आनंदाने 
"हो.. आवडेल मला" असं म्हणालो आणि तिच्याशी मैत्रीचा हात मिळवला..

     मी मितालीच्या प्रेमात पडलो होतो. दिवस रात्र तिचाच विचार करायचो. आजच्या रात्री देखील मी तिचाच विचारत करत होतो. मिताली, बिचारी अनाथ होती. तरी बरं रेखा काकूंनी तिला माया दिली, प्रेम दिलं.  पण.. हे प्रेम ही माया नक्की खरी होती का.. की मितालीला आपल्या जाळ्यात ओढण्यााठी च षडयंत्र.. मी त्या पुस्तकात वाचलेलं अजुन एक वाक्य मला आठवलं - चेटकिणीची वाणी मधुर असते, गोड असते.याच मधुर बोलिमुळे रेखा काकूंनी मिताली का तिच्या जाळ्यात तर ओढलं नसेल..माझ्या शंकेला आता थोडीफार दिशा मिळत होती... काय करावे काय नाही मला काहीच कळत नव्हते.. मला आता एवढंच ठावूक होतं मिताली ला ही सत्य परिस्थिती सांगावी... आणि तिचा जीव वाचवावा.. पण ते कसं काहीच कळत नव्हते..

     मी आणि मिताली शाळा सुटल्यावर घरी जाताना रोज नेहमी एकत्र जायचो..खूप गोड होती ती, छान बोलायची.. अख्ख्या सोसायटी मध्ये मीच तिच्याशी बोलत असते.. बाकी सारे तिच्याशी मैत्रीच करत नव्हते..कारण ती रेखा काकूंची मुलगी आहे याच भीतीने ते घाबरत होते..पण आमच्यात आता छान मैत्री झाली होती.. तरी सुध्दा तिच्या चेटकीण आई बद्दल अजून सुध्दा मी तिला खरं सांगितलं नव्हत..  अशातच एके दिवशी शाळेतून घरी येत असताना तिने मला विचारले 
"काय रे मुकुंदा.. माझ्याशी एवढा गप्पा मारतोस.. आपण एवढे छान मित्र मैत्रीण झालो आहोत. तर माझ्या घरी का येत नाहीस..?"
"तुझ्या घरी... अबब.. ते आपलं हे ते.. येईन ना. लवकर च.."
"तुला माहिती आहे. आई घरी किती एकटी असते.. बिचारी.. तिच्याशी गप्पा मारायला कोणीच येत नाही. मीच फक्त शाळेतून घरी आल्यावर तिच्याशी मनसोक्त गप्पा मारते."
"तुझ्या आईशी कसं कोण गप्पा  मारेल. चेटकीण आहे ती चेटकीण." मी मनातल्या मनात तिला उत्तर दिलं. कारण तसं समोरासमोर सांगण्याची माझी हिम्मत होत नव्हती.
"तू उद्या माझ्या घरी येशील का?". तिने विचारले.
"उद्या....?"
"प्लीज येना. अरे मला गणिताचे स्वाध्याय पूर्ण करायचे आहेत.पण पद्घत माहीत नाही. तू कसा हुशार आहेस. त्यामुळे आपण एकत्र अभ्यास करू. मलाही मदत होईल. आणि त्या निमित्ताने तू आमचं घर सुध्दा बघशील. "
"किती वाजता येऊ?" मी तिच्या मनाचा मान ठेवत म्हणालो.
" उद्या शनिवार आहे ना. संध्याकाळी ६ वाजता ये. "
"बरं..."


दुसऱ्या दिवशी...

    मला तिच्या घरी जायला फारच भीती वाटतं होती. कारण आमच्या सोसायटी मधलं कोणीच म्हणजे कोणीच त्यांच्या घरी अद्यापही गेलेलं नव्हतं.  पण मी तिच्या घरी जायचं मोठ्या हिमतीने ठरवलं.. तरच मला रेखा काकू बद्दल निरीक्षण करून थोडं फार कळू शकेल.. आणि माझ्या शंकेला सत्याचा मार्ग मिळेल..

    मी आईला राम्या कडे  अभ्यास करायला जातो आहे असे सांगितले. कारण राम्या सुध्दा त्याच विंगमध्ये राहत होता. त्यामुळे त्या विंगेत जाताना कोणी पाहिलं आणि कोणाकडे जातोय असं विचारलं तर सांगतां येईल. मी बी विंग मध्ये आलो. राम्या तिसऱ्या माळ्यावर राहत होता.. त्याच्या घरात गेलो..पण फक्त १० मिनिट थांबलो.. निम्मित म्हणून त्याची गणिताची स्वाध्याय वही सहज मागितली.. त्यानंतर मात्र मी मिताली कडे आलो.. पाचव्या आणि शेवटच्या माळ्यावर.

  पाचव्या माळ्यावर खूप शांतता होती..  मी मिताली च्या दारापाशी उभा होतो.. खोली क्रं ५०३.. मी बेल वाजवली... ५-६ बेल दिल्यानंतर दरवाजा उघडला गेला.. रेखा काकूंनी तो उघडला . त्यांना पाहून मी जरा दचकलो.. कारण मिताली दरवाजा उघडेल ही माझी अपेक्षा मोडली होती..  
"तू कामतांचा मुकुंद ना रे? " रेखा काकूंनी मला  विचारले
"होय काकू.."
"ये ये.. आत ये बाळ.."
मी आत गेलो.. काकूंनी मला बसायला सांगितले... आणि त्यांनी माझ्यासाठी पाण्याचा ग्लास आणला.. आणि त्याही सोफ्यावर बसल्या.. मी काकूंकडे पाहतच होतो.. त्यांनी साधी लाल साडी घातली होती..  त्या बोलू लागल्या -
"मिताली मला बोलली होती.. अभ्यास करण्यासाठी तू येणार आहेस करून.. अगदी वेळेवर आलास रे.." 
"काकू मिताली कुठेय?"
"मिताली.. ती खाली गेलीय मेडिकल मध्ये.. "
"मेडिकल मध्ये?"
" अरे काय सांगू राजा तुला.. कालपासून नुसती माझी मान दुखतेय.. या दुखण्यामुळे झोपच लागत नाही रात्रीची.. आणि माझ्या मिताली का काळजी ना रे माझी लगेच गेली बघ बाम आणायला मेडिकल मध्ये.."
" तशी आहेच ती गुणाची.. " 
" अरे मी काय बोलत बसले. तुला साधा चहा सुध्दा नाही विचारला.. थांब मी चहा टाकते.. "
काकू आत किचन मध्ये गेल्या..आणि चहा बनवू लागल्या..
"फरसाण चालेल ना रे?" त्यांनी आतूनच मला विचारले..
"हो काकू " मी म्हणालो.
त्यांचं घर एकदम टापटीप शिस्तीत ठेवलेलं होतं..  छान नक्षीदार रंगकाम केलेलं होतं.. भिंतीवर छान मॉडर्न आर्ट च्या पेंटिंग होत्या.. त्यातल्या त्यात माझं लक्ष तिथल्या एका फोटोवर गेलं.. लहान बाळाचा फोटो होता तो.. मी सहज विचारलं -
"काकू हे बाळ खूप सुंदर आहे" काकू चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्या. सोफ्यावर बसल्या. मी चहाचा कप घेतला.
" माझ्या रुजुत चा फोटो आहे तो. पाच महिन्याचा असताना आम्ही काढून ठेवला.. पण या फोटोला तरी कुठे ठाऊक होतं की काही महिन्यातच याच्यावर हार चढवला जाईल ते.." काकू थोड्या दुःखी स्वरात म्हणाल्या.
"काकू.. सॉरी.. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं"
"सगळे म्हणतात मीच माझ्या मुलाला मारलं. पण तसं काही नाही झालं..  मी त्याची आई होते सख्खी आई.. मी स्वतःच्या मुलाला मारेन का. तू सांग मुकुंद स्वतःची आई कधी तिच्या बाळाचा जीव घेईल का. मी काय मूर्ख आहे का. इतकी नीच आहे का.मी लाख वेळा साऱ्यांना सांगितलं की माझं बाळ अपघातात गेलं.. पण हा साला समाज ना.. नीच आहे.. घृणा करते मी अशा घाणेरड्या समाजाचा"
काकू बोलता बोलता एका विलक्षण देह बोलीत गेल्या. मला त्यांच्या या बोलण्याची भीतीच वाटू लागली. इतक्यात दाराची बेल वाजली..  माझी भीती जरा कमी झाली.. कारण दारात मिताली आली होती.. मग मी पुढ्यातला चहा संपवला. आणि मितालिला गणितं समजवून देऊ लागलो..
रेखा काकू किचन मध्ये जेवण करत होत्या.. आमचा अभ्यास आता झाला होता.. मला तहान लागली होती.. मी मिताली ला सांगितलं.. ती "किचन मध्ये जाऊन घे रे.. पाहुणा आहेस का"  म्हणाली. मी किचनमध्ये जायला निघालो.. मिताली सोडवलेली गणिते सराव करत बसली. मी किचन च्या दाराशी उभा होतो.. आणि.. आणि समोर जे पाहिले ते पाहून मी जागीच थक्क झालो.. रेखा काकू.. किचन मध्ये पाठमोऱ्या उभ्या होत्या.. गॅस वरती कुक्कर च्या शिट्या वाजत होत्या.. पण त्या त्यांचा आंबोडा सोडत होत्या.. मी त्यांना पाहतच होतो.. त्या हे सर्व करताना स्वतःशीच खुदकन हसत होत्या.. हा प्रकार मला विलक्षण वाटला.. मग  त्यांनी त्या आंबोड्या पासून त्यांचीच लांब लचक वेणी तयार केली.. ती वेणी फारच लांब होती.. मला आता कळून चुकले होते.. रेखा काकू चेटकीण होत्या... त्यांच्या लांब वेणी वरून मी त्यांना ओळखले.. त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिले.. 
"आलास बाळ?? बोल काय हवय ? पाणी हवय का?"
मी घाबरलो.. कारण समोर जी होती ती रेखा काकी नव्हती.. ती एक चेटकीण होती.. मी तिथून परत माझ्या घरी जायला निघालो.. मिताली ने मला अडवण्याचा प्रयत्न केला.. पण मी तिचे काही ऐकले नाही.. मी सरळ बी विंग मधून खाली उतरलो.. माझ्या घरी आलो.. खोलीत शिरलो.. आणि शांत पणे बेडवर पडलो..आणि सुटकेचा श्वास घेतला..

     दुसऱ्या दिवशी मी आणि मिताली ठरल्या प्रमाणे शाळा सटल्यानंतर एकत्र भेटलो.. पण मी मात्र यावेळी गप्प होतो...
"काय रे मुकुंदा? असा गप्प का आहेस? तिने मला विचारले
"कुठे काय? काय नाय?"
" आणि काय रे शाण्या. काल अचानक असा घरातून पळून का गेलास रे?"
" काही नाही ग. मला ते महत्वाचं काम आठवलं होतं म्हणून"
"अच्छा इतकं महत्वाचं की उत्तर न देता निघून गेलास?"
"हो"
"बरं.. अरे आई तुला भेटून खूप खुश होती. कारण कधी नव्हे ते तिच्याशी गप्पा मारण्यासाठी नवीन कोणीतरी आलं होतं. "
मी फक्त  "हं" इतकंच केलं. 
" परत कधी येशील आमच्याकडे?"
"बघू..." मी शांतपणे उत्तरलो.
"ए बघू काय रे.. तुला यावच लागेल... पुढच्या आठवड्यात एक खास दिवस आहे.. तेव्हा तुला यावच लागेल.. "
"खास दिवस?"
"अरे हो.. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी माझ्या आईचा वाढदिवस आहे रे.. त्यामुळे मी तुला स्पेशल इन्विटेशन देत आहे, कळलं. तू यायचं हा?"
"मी ट्राय करेन"
" मुकुंदा.. आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. मग मैत्री साठी तुला यावच लागेल.. "
" येईन" एका विलक्षण आत्मविश्वासाने मी तिला म्हणालो.
मला आता खात्री करून घ्यायची होती. आणि या गोष्टीचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचा होता..
मी घरी आलो. कॅलेंडर तपासले. माझी खात्री पटली..  पुढचा शुक्रवार म्हणजे २९ फेब्रुवारी. येस. माझा डाऊट खरा ठरला. रेखा काकीचा वाढदिवस २९ फेब्रुवारी ला आहे म्हणजेच रेखा काकी १००% चेटकीण आहे. आणि मिताली ला तिने दत्तक घेतलं ते म्हणजे तिचा बळी घेण्यासाठी.  असाच बळी तिने चार वर्षा आधी तिच्या बाळाचा घेतला होता. मला तिचं पितळ उघड पडायचं होतं. तिला आता कायमचं नष्ट करायचं होतं. कारण ती आता माझ्या मिताली च्या जीवावर उठली होता.. माझ्या मिताली च्या जीवाला त्या चेटकिणी पासून धोका होता.. मिताली ला वाचवणे माझे कर्तव्य होते.. आणि म्हणूनच या चेटकिनीचा अंत माझ्या हातून होणार होता. मी ठरवलं वाढदिवसाचं निम्मित साधून मितालीच्या घरी जायचं आणि मिताली ल कसल्या तरी कामात गुंतवून बाहेर पाठवायचे आणि मग नंतर त्या चेटकिणी ला नष्ट करायचं..!

    २९ फेब्रुवारी... दिवस उजाडला...  मी तसा तयारीमध्येच होतो.. मधल्या सुट्टीत शाळेच्या अंगणातून फेरफटका मारत असताना धारधार दगड मी शोधला आणि तो माझ्या बॅगेत भरला.. शाळेतून घरी जाताना मितालीने मला आजच्या दिवसाची आठवण करून दिली. तिने मला संध्याकाळी ठीक आठ वाजता येण्यास सांगितले.. मी तयारच होतो. 

      संध्याकाळी ७.३० नंतर मी घरातून बाहेर पडलो. बाहेर पडताना पुन्हा तेच रम्याच्या घरी जातोय असं निम्मित दिलं..
मी बी विंग मध्ये आत शिरलो.. पाचव्या माळ्यावर आलो.. मिताली च्या दाराची बेल वाजवली.. यावेळी तेच झालं.. दार रेखा काकूंनी उघडलं. मी आत शिरलो..  काकूंनी मला सोफ्यावर बसण्यास सांगितलं.. मी काकूंना शुभेच्छा दिल्या.. काकू आज खुश वाटत होत्या.. असणारच.. कारण आज त्या त्यांच्या मूळ रूपात त्या येणार होत्या.. मूळ रुपावरन माझं लक्ष त्यांच्या पेहरावा कडे गेलं.. त्यांनी लाल रंगाची साडी घातली होती.. गडद लाल.. मिताली घरात दिसत नव्हती. मी काकूंना विचारलं.
"अरे ती बेकरी मध्ये केक आणि सॉफ्ट ड्रिंक वगैरे आणण्यासाठी कधीची गेली आहे अजुन आलो नाही बघ. "
"बरं ठीकाय काकू. मी आहे इथे निवांत" 
काकू आत त्यांच्या खोलीत गेल्या. मी तसाच सोफ्यावर बसून राहलो. आणि मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे या चेटकिणीला नष्ट करण्याची. काकू खोलीत तर गेल्या होत्या  पण त्या बाहेर येतच नव्हत्या. त्या घरात एकदम शांतता वाटतं होती. असं वाटतं होत की मी एकटाच त्या घरात आहे.  मला जराशी भीती वाटू लागली. तरीही मी धीट मनाने माझ्या खिशातला तो धारधार दगड बाहेर काढला आणि एका हातात धारधार सुरा घेतला. आणि त्या खोलीच्या दिशेने जायला निघालो. काकू कपाटातून काहीतरी काढत होत्या. त्या पाठमोऱ्या होत्या. त्यामुळे त्यांची लांब लचके वेणी मला स्पष्ट दिसत होती. हीच ती संधी आहे असे मी स्वतःला सांगितले. आणि मी हातातला सुरा घेऊन सरळ त्यांच्या वेणी वरती वार केला.. त्यांची वेणी  कापली गेली आणि खाली पडली.. रेखा काकूंनी मागे वळून पाहिले. त्यांची खाली पडलेली वेणी बघून त्या मला ओरडल्या.. माझ्या अंगावर धावून आल्या.. पण मी यावेळी त्यांना घाबरणार नव्हतो.. मी दुसऱ्या हातातील धारधार दगडाचा वार सरळ त्यांच्या माने जवळ केला. त्या दगडाने तिच्या कंठावरती तीन वेळा आघात केला. रेखा काकू विचित्र  कर्कश किंचाळल्या. आणि जागीच कोसळल्या. त्यांच्या मनातून तीव्र रक्तस्राव होत होता. पण रेखा काकू गायब किंवा अदृश्य मात्र झाल्या नाही. पुस्तकात तसं लिहिलं होतं.. अर्थात हे लेखक लोकं वाढवून च लिहितात ना. असो.. पण रेखा चेटकिणीचा आता अंत झाला होता.. तो कायमचा...मी हे करून दाखवलं होतं.. माझ्या मिताली ला त्या मरणाच्या वाटे पासून मी मुक्त केलं होतं.. 
       काही वेळाने तिथे मिताली आली.. माझे रक्ताने माखलेले हात पाहून ती थक्क झाली.. ती आत तिच्या आईच्या खोलीत शिरली.. . आणि तिच्या आईकडे पाहतच बसली.. स्तब्ध.. शांत.. मी तसाच चालत चालत तिच्या कडे गेलो.. तिला झाला प्रकार स्मजवण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला.. तिने तसेच मागे वळून पाहिले. तोच मी एकदम शॉक झालो. तिचे डोळे मानवी नव्हते.. तिच्या डोळ्यात काळा रंग संपूर्ण पणे सामावलेला होता. मिताली माझ्याकडे धावून येत होती.. एकेक पाऊल हळू.हळू टाकत ती माझ्याकडे येत होती. मी  तिचं हे रूप पाहून घाबरत घाबरत मागे होत होतो. ती आता एका वेगळ्याच प्रौढ बाईच्या आवाजात गंभीरपणे बोलू लागली बोलू लागली  -
"मारलंस तू हिला.. बरं केलंस.. नायतर मीच हिला ठार मारणार होते.. चांगली अनाथ आश्रमात होते मी.. चार वर्षांनी एक एक लहान मुलाचा प्राण घेताना सोपं जायचं रे मला.. लहान मूल सहज उपलब्ध व्हायची तिथे.. आणि पुढेही होणार होती.. आमाप, पुष्कळ लहान मुलं.. पण या बाईने समाजसेवा म्हणून मला तिथून हिच्या जवळ आणलं.. आणि माझी भूक भागवणारे अनाथ आश्रम माझ्या पासून दूर गेलं..  पण नशीब इथे मला तू दिसलास.. तेव्हाच मी ठरवलं या वर्षीचा बळी तुझा घ्यायचा. " 
  मी खूप भयंकर घाबरलो.. आणि जागीच कोसळलो.. मिताली ने तिचे केस सोडले आणि तिच्या केसांची आपोआप वेणी बांधली गेली. मिताली ने घातलेला लाल ड्रेस अत्यंत भयंकर वाटत होता... रेखा काकी चेटकीण नसून माझी मितालीच  चेटकीण होती यावर माझा विश्र्वासच बसत नव्हता. मी निष्पाप रेखा काकुचा खून केला होता.. माझ्या हातून भलं मोठं पाप घडलं होतं..  मिताली माझ्याकडे धावून आली.. तिने माझा गळा घट्ट पकडला.. आणि मला एका हातात वर उचलले, हे करताना कसले तरी गूढ मंत्र तिच्या दाट कर्कश आवाजात ती गुणगुणत राहिली.. तिच्या या आवाजाने माझ्या कानांचे पडदे फाटू लागले.. तिथून रक्तस्राव होऊ लागला.. माझा जीव गुदमरू लागला, हातपाय थरथर कापू लागले,सारा देह तडफडू लागला.. माझी मिताली.. सुंदर मिताली.. गोड आवाज असलेली मिताली.. मधुर वाणी असलेली मिताली.. चेटकीण कशी काय असू शकते... अरे हो.. चेटकिणीची वाणी मधुर असते.. आणि हेच तिचं षडयंत्र असतं ज्या द्वारे ती तिच्या भक्षकाला जाळ्यात अडकवते.. दादाने गिफ्ट म्हणून दिलेल्या पुस्तकातलं हे वाक्य मला  आठवलं... पण आता आठवून काही फायदा नव्हता.. माझा प्राण जात चालला होता.. माझा प्राण जाईपर्यंत , माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत  मला नाईक काकूंनी माझ्या आईला सांगितलेली गोष्ट आठवू लागली -

'आजकाल माणसांच्या वागण्याच्या काही भरवसा देता येत नाही ओ..माणूस कोण आणि सैतान कोण हेच ओळखण कधीकधी कठीण जातं..!'


********समाप्त*********







  



     

No comments:

Post a Comment

निर्मित (भयकथा/ गूढकथा)

"निर्मित" लेखक✍️- अजय धामणे "अवि, जाशील ना रे नीट..! कसली भीती नाय ना वाटणार??"- एकजण अवि ला म्हणाला. "हं..! भी...