Sunday, May 3, 2020

"मृत्युंजयी" (गूढकथा)
           "मृत्युंजयी"

                       लेखक - अजय अनंत धामणे

            


      ठक ठक ठक.. दरवाज्यावर तीन थापा वाजल्या.
"कोणी आहे का घरात ??? "
पुन्हा तीन थापा वाजल्या. "आहे का घरात कोणी?"
"कोण इला इतक्या सायंकाळी?" नाना त्यांच्या आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाले
नानांनी दरवाजा उघडला.
"आपण?"
"नमस्कार.. मी जयवंत."
"जयवंत?"
".तुमची वर्तमान पत्रातली जाहिरात वाचली होती मी , कोकणात भाड्याने  राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे. मी तुम्हाला दूरध्वनी देखील केला होता आणि तुम्ही होकार देखील कळवता होता."
" अच्छा.. अच्छा. अच्छा. जयवंतराव. तुम्ही होय. या आत या. तशी प्रत्यक्ष भेट झाली नाय हो आपली  म्हणून तुमका ओळखलंय नाय.."
आत आलेल्या जयवंत ला समोरील लाकडी खुर्ची देत, बसण्याची विनंती करीत नाना म्हणाले " या बसा. बरं. व्यवहाराचं सगळं ठाऊक आहे ना?"
"हो, दरमहा दीडशे रुपये भाडं आणि.."
"आणि १ हजार रुपये डीपोसिट.."  - नाना जयवंत चे वाक्य अर्धवट तोडीत म्हणाले.
"हे घ्या १ हजार रुपये"
" अहो द्या अाे नंतर. पैशे काय कुठं पळून जातात होय."
" कोकणात भाड्याने जागा मिळनं खूप कठीण असतं अहो. आणि इतक्या स्वस्त दरात मिळालं म्हणून आलो बघा
खरं तर  मी फक्त तीन महिण्याकरिता इथे भाड्याने राहणार आहे.."
नाना थोडा रागीट चेहरा करीत त्याच्याकडे पाहत म्हणाले - "फक्त तीन महिने"
जयवंत म्हणाला " अहो मी पत्रात तसे कळविले होते. कारण बँके ची बदली इथे फक्त तीन महिन्या साठीच झालीय ना"
" चलात. तीन तर तीन. भागवून घेऊ त्यात"
"माझी रहाण्याची जागा?"
नाना जयवंताला आत घेऊन गेले.  नानांचा वाडा खूप मोठा आणि प्रशस्त होता. एखाद्या सिनेमाच्या सेट मधील बंगल्या पेक्षाही मोठा प्रशस्त. इतका मोठा वाडा जयवंताने आजवर पाहिला नव्हता. मुंबईच्या १० बाय १० च्या भाड्याच्या खोलीची सवय त्याला होती. मुख्य दरवाजा पासून जेमतेम पाच पावले टाकली की स्वयंपाक खोली यायची आणि मग २ ढेंग्या उडवीत उड्या मारल्या की सरळ नहाणी घरात. पण नानांच्या घराची जयवांता साठी ची खोली १०- १५ पावले चालून ही अद्याप येत नव्हती
नाना बहुधा एकटेच घरात रहात असावे असे भासत होते. कारण नाना खेरीज अन्य कोणी तिथे नव्हतेच.
"नाना तुम्ही एकटेच राहाता का ओ इथे"
" दोघं."
"दोघं?"
"एक मी आणि हा एक वाडा. " असा फुटकळ विनोद करीत नाना स्वतःशीच हसले. जयवंत मात्र त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला.
" ही बघा. ही तुमची खोली"  जयवंताला त्याची खोली सापडली. त्याने दार उघडले. चांगली साफ सफाई करून अगदी व्यवस्थित काटेकोर पद्घतीने खोली ठेवण्यात आली होती. "चला साफसफाईचा प्रश्न मिटला" असे काहीसे त्याला वाटून गेले.
" नाना हे बाकी चांगलं केलंत हा. खोली एकदम टापटीप आहे. आवडली आपल्याला.."
"आवडली ना. मग बस."
"पण काय ओ नाना. इथं राहण्यासाठी तुम्ही मला काही नियम आणि अटी सांगणार होतात. नाय म्हणजे पत्रात तुम्ही तसे नमूद केले होते. की जे काही आहे ते इथे आल्यावर सांगिन."
" सांगतो. नियम क्रमांक १ इथे राहण्यासाठी कोणतीही नियम नाही, पण हा अट मात्र एकच आहे."
" कोणती?"
" तुमच्या खोली बाजूच्या सलग असेलल्या या ३ खोल्या तुम्ही कशाही तुम्हाला वाटेल तशा वापरू शकता. पण हा ही ४ थी खोली अजिबात चुकून पण वापरू नका. ती कायम बंद असता हा."
" बंद का असते"
" श श श श... आत खोलीत बसून बोलून."
नाना व जयंवत आत बसतात.
" तुमचा भुता प्रेतावर, मृत्युंजय मंत्र या सगळ्यांवर विश्वास हाय काय?"
" छे ओ.! चांगला शिकलेला आहे मी. एज्युकॅटेड पर्सन"
"विश्वास असात किंवा नसात त्याचाशी काही घेणा देणा नाय
. पण मीया जे सांगतय ते तुमच्या भल्यासाठी हाय बाबा.
त्या ४थ्या खोलीत तो राहता."
"तो?
" होय तो. नाव गाव त्याचं ठाव ठिकाण आमका पन माहीत नाय. पण खूप आधीपासून तो हय रवता , जवळजवळ गेले ३०० वर्षाहून अधिक..
" काय? ३०० वर्षाहून अधिक. कसं काय शक्य आहे?" जयवंत जरा दचकत म्हणाला.
" शक्य हा.. कारण,,... कारण त्याच्याकडे मृत्युंजय मंत्र हा. तो अमर असा. एका वर्षात १० नरबळी दिल्यानंतर त्यानं हा मृत्युंजय मंत्र काबीज केला म्हणून तो अमर असा. आहे.तो काहीही करू शकता.  म्हणून तर मंत्र तंत्र करून देव देवस्की करून त्याका थयसर कायमचं अडकवून ठेयलय. "
नानांचे हे शब्द ऐकून जयवंत अधिकच  घाबरला. " नाना तुम्ही मला हे आता सांगताय. आधी का नाही सांगितलं"
" आधी सांगितलं असता तर तुम्हीच रवायची सोय खय झाली असती. आणि एवढ्या स्वस्तात तुमका खोली गावली असती काय. पण घाबरु नका ओ. तो आता थयसर कायमंचो बंद असा ओ. आमच्या पूर्वजांनी तेका कायमचो डांबून ठेवल्यान हा."
" म्हणजे मला त्याच्यापासून काही धोका नाहीये ना"
"अजिबात नाय. उलट तुम्ही असा समजायचा की हयसर फक्त तीनच खोल्या असत
चौथी अस्तित्वाचं नाय असा."
" हा ठीक आहे. हे योग्य वाटतं"
" चला आता सामान आवरून ठेवा.हात पाय धुवून बाहेर या. जेवण वाढून ठेवतय."

जेवण आटोपून जयवंत आपल्या खोलीत आला आणि प्रवासामुळे थकला असल्याने बिछान्यावर पडला. पण मगाच्या विचाराने त्याला झोपच येईना कशी येईल, आपल्या बाजूच्या काही खोल्या सोडून एक माथेफिरू कोणीतरी नराधम राहतो याची कल्पना त्याचं डोकं सतावत होती.. रात्र पुढे सरली. आणि मध्यरात्र झाली. बाहेरच्या रातकिड्यांचा कर्कश आवाज आणि खोलीतल्या जुनाट  पंख्याचा खट खट असा सातत्याच्या आवाज फक्त कानास पडत होता. हे सगळं चालू असताना. अचानक, अचानक त्याला दरवाजाच्या काही थापा ऐकू आल्या. ठक ठक ठक.. त्याने कानोसा घेतला. बाहेरच्या खोल्यांपैकी एका खोलीचा दरवाजा वाजत असावा. बाहेर जावं की नाही हा विचार त्याचात घुमत राहिला. पण चिकित्सक वृत्ती असलेला जयवंत त्याच्या खोलीचं दार उघडून बाहेर गेला. चौथ्या खोलीचा दरवाजा मंतरलेल्या टाळ्या पासून मुक्त झालेला होता आणि  मोठ्याने वाजत होता
इतक्या मोठ्याने की तो अक्षरशः हलत होता.  इतक्यात त्याला नानाचा आवाज त्याला त्या खोलीतून ऐकू आला - " जयवंतराव अहो वाचवा मला. अहो या सैतानाने माझा गळा धरलाय. अहो लवकर या. वाचवा अहो कोणीतरी वाचवा."
नानांचा तो आक्रोश जयवंताला सहन होत नव्हता. नाना अडकेले गेले होते. त्या नराधमाच्या कचाट्यात सापडले होते. त्यांना वाचवायला हवे. जयवंत धावत त्या चौथ्या खोलीपाशी आली आणि त्याने दरवाजा उघडला.. इतक्यात आतून मोठा कोयता जयवंतावर मारला गेला... जयवंत च्या डोक्याला मध्यभागी अर्धवट तडा गेलो होती. रक्तबंबाळ झालेला देह त्याचा त्या चौथ्या खोली पाशी  तसाच पडला.. तो सरकत आत खेचला गेला..
...............

"येवा सुधाकर राव येवा. यो आमचो वाडो. आणि ही तुमची खोली."
एक महिन्या नंतर  नाना नुकताच पेईंग गेस्ट म्हणून आलेल्या सुधाकरला त्याची खोली दाखवत होते
"नाना आणि ही चौथी खोली कोणाची ? अशी बंद का असते ओ?"
" श श श श .. आत खोलीत चला सांगतो -
"नाव गाव त्याचं ठाव ठिकाण आमका पन माहीत नाय. पण खूप आधीपासून तो हय रवता , जवळजवळ गेले ३०० वर्षाहून अधिक... मृत्युंजयी. अमर आहे तो.. त्याच्याकडे मृत्युंजय मंत्र हाय. तो अमर आहे.. दरवर्षी एक नरबळी दिल्यानंतर त्याने हा मृत्युंजय मंत्र काबीज केलाय म्हणून तो अमर हाय  एका नरबळी वरती त्याच अमरत्व वाढतं असं म्हणतात. .तो काहीही करू शकतो. म्हणून तर मंत्र तंत्र करून देव देवस्की करून त्याका थयसर कायमचं अडकवून ठेयलय. मृत्युंजयी आहे तो मृत्युजयी. "
नाना आणि सुधाकर चं हे संभाषण संपल्यानंतर नाना बाहेर आले आणि त्यांच्या खोलीत येऊन नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडता कोयता दगडावर धार देण्यासाठी पाजळायला घेतला..! आणि हे सगळं करताना नाना आता खूप खुश होते..,

कारण,  ते आता ३०१ वर्षांचे होणार होते..!....समाप्त......


No comments:

Post a Comment

निर्मित (भयकथा/ गूढकथा)

"निर्मित" लेखक✍️- अजय धामणे "अवि, जाशील ना रे नीट..! कसली भीती नाय ना वाटणार??"- एकजण अवि ला म्हणाला. "हं..! भी...